Wednesday 28 March 2012

मांसाहार हाच नैसर्गिक आहार! : भाग-१





इतरांनी काय करावं, कसं वागावं हे सांगण्याची माणसाला फार हौस असते. यात आपल्याला ज्याचा चांगला अनुभव आला आणि फायदा झाला ते इतरांना सांगावं, असा सद्भाव मनात असल्यामुळे वैयक्तिक पातळीवर काही सांगावं हे ठीकच म्हणायचं. पण ते सांगतानाही आपला अनुभव तर्कसंगत होता का, जो फायदा घडला त्याच्या कार्यकारणसंबंधाची सत्यता खरेच आहे का हे मुद्दे महत्त्वाचे असतातच. ते तपासून मगच ती माहिती इतरांना देणे हा झाला ज्ञानप्रसार, सत्यता न पडताळता एखाद्या गोष्टीचा श्रद्धात्मक आग्रह धरून सांगत राहणे म्हणजे अंधश्रद्धेचाच प्रसार.
धार्मिक- आध्यात्मिक कल्पनांच्या विश्वात असे अनेकदा चालतेच. प्रश्न येतो, जेव्हा रोजचे आवश्यक व्यवहार, निसर्गाचे व्यवहार या क्षेत्रात असल्या अंधविश्वासातून स्फुरलेल्या कल्पना थयथयाट करू लागतात तेव्हा. आज हा थयथयाट माणसाच्या आहाराबाबतही होऊ लागला आहे.
माणसाने काय खावे, कसे खावे, का खावे याचा विचार मानवी संस्कृतीच्या प्रत्येक टप्प्यावर विकसित होत गेला. जे उपलब्ध आहे, जशी हवा आहे, जशी प्रकृती आहे त्यानुसार विविध प्रदेशातल्या विविध लोकांनी आहाराच्या पद्धती ठरवल्या. अन्नग्रहणाचे रीतीरिवाज ठरवले. आज जग जवळ आल्यानंतर एकमेकांच्या आहारपद्धती स्वीकारल्या गेल्या. यात अनेकविध धान्ये, कडधान्ये, फळे-मुळे, पाने-फुले असा शाकाहार, मत्स्याहार, मांसाहार, दही-दूध-लोणी- तूप, अंडी, चीक असा प्राणिज आहार अशा वैविध्यपूर्ण घटकांचा समावेश होत गेला.
जगातील कुठल्याही धर्मात मांसाहार पूर्णपणे वज्र्य करावा, असे सांगण्यात आलेले नव्हते. प्रत्येक धर्मात काही वस्तू वज्र्य आहेत. काही विशिष्ट काळासाठी काही आहार्य वस्तू वज्र्य आहेत. हिंदू धर्माला फुटलेल्या केवळ एका पांथिक शाखेत म्हणजे जैन धर्मपंथात अशाक आहार पूर्णत: वज्र्य मानण्यात आला आहे. आताशा जैन धर्मपंथ एखाद्या पूर्ण धर्माप्रमाणे अधिकाधिक होत चालला आहे हा भाग अलाहिदा.
पण आजकाल जगभरच सर्वत्र मूळ धर्माचा भेदाभेद न राहता शुद्ध शाकाहारी बनण्या-बनवण्याचा धर्मपंथ बळावत चालला आहे. मांसाहाराविरुद्ध जिहाद पुकारल्यासारखी प्रचारकी भाषा वापरली जात आहे. भावुकतेच्या आहारी जाऊन अनेक मांसाहारी लोक नाहक अपराधी भावनेने ग्रस्त होत त्यात सामील होत आहेत.
व्यक्तिगत आवडनिवड म्हणून कुणी शाकाहारी राहायचे ठरवले तर तो मुद्दा मान्य करता येईल, अशा व्यक्ती कुणी आग्रहच केला तर नम्रपणे मला आवडत नाही, मला चालत नाही, अशी उत्तरे देऊन अशाक आहार घेण्याचे टाळतात किंवा कधी थोडी चव घेऊनही पाहतात.
हिंदू धर्मात ब्राह्मण्याचे पावित्र्य जपण्याच्या काही निकषांमध्ये अशाक आहाराला अभक्ष्य ठरवण्यात आले असले तरीही आधुनिक जगात पाऊल ठेवलेले जातीने ब्राह्मण असलेले अनेक लोक हे निकष मानत नाहीत. मांस-मासे-अंडी अभक्ष्य मानत नाहीत. ब्राह्मण्याचे निकष बदललेल्या जगात तर्कसंगत विचार करून त्यानुसार आहार बदललेली अशी तिसरी पिढी तरी भारतात आहेच.
परंतु त्याचवेळी शाकाहारासंबंधी आग्रही प्रतिपादनाला आता एखाद्या आक्रमक धर्मपंथाची कळा येऊ लागली आहे. यावरून कुणालाही हा संदर्भ मुंबईसारख्या महानगरातील जैन पंथीयांच्या वर्तनाला अनुलक्षून आहे की, काय असे वाटेल. तसे तर आहेच. पण हा संदर्भ तेवढय़ापुरता मर्यादित मात्र नाही. भारतीय परिघाबाहेरही, जागतिक स्तरावर शाकाहाराचा प्रचार करणाऱ्या गटांनी अवास्तव मुद्दे उपस्थित केले आहेत. त्या मुद्दय़ांचा कठोर प्रतिवाद करण्याची गरज आहे कारण या वादामुळे माणसामाणसात प्रकारचे विभाजन (्िर५्रीि) होण्याची शक्यता तर आहेच, पण मानवी प्रगतीचा एकुणात अधिक्षेप करणाऱ्या एका अविचारालाही या मंडळींच्या आक्रस्ताळेपणामुळे जोर येतो. जगातील अनेक माणसे, लहान मुले एका उत्तम प्रकारच्या प्रथिनयुक्त आहाराला मुकतात. आरोग्य समस्यांच्या विळख्यात नाहक अडकतात.
विज्ञानाच्या परिभाषेचा दुरुपयोग करून फार खोलात जाऊन विचार न करणाऱ्या लोकांची दिशाभूल करणारे बाबा, बुवा, फेथ-हिलर्स तर आपण पाहतोच. हा प्रसिद्धी आणि पैशाचा सारा खेळ असतो. यांच्या जोडीला इतरही अनेकांचे पडाव पडले आहेत. ज्यांना ज्यांना काही विशिष्ट ‘दुकान’ चालवायचे आहे, प्रस्थापित सत्यांना विरोध दर्शवून आपले वेगळेपण प्रस्थापित करायचे आहे, अशा जगभरातल्या विविध गटांत कोण कोण आहेत.. पृथ्वीच्या रक्षणाचे ठेकेदार, प्राणीप्रेमाचे ठेकेदार, पर्यायी आरोग्य नीती, पर्यायी विकासनीती, रिव्हर्स इंजिनीअरिंगची भाषा बोलणारे आधुनिक महंत अशा अनेकांची मांदियाळी त्यात पाहायला मिळते. या सर्वाचीच दुकाने भोळसट बहुसंख्येमुळे आणि या बहुसंख्येच्या बहुत्वाला भिऊन असलेल्या सत्तेच्या दुकानदारांमुळे तशी तेजीत चालतात. सर्वाचेच ध्येय पैसा असते, असेही नाही. कुणाला प्रसिद्धीचे वलय हवे असते, कुणाला काटेरी मुकुट. जसे ध्येय तसा मोबदला बरोबर मिळतो. पैसा हवा असेल त्यांना फंड्स आणि काटेरी मुकुटाच्या प्रेमात असलेल्यांना पारितोषिके, कधी कधी तर दोन्हीही मिळतात. सभा-संमेलने, प्रकाशने, बिझनेस कम प्लेझर ज्यादा अशा परिषदा हे एक पैसा मिळवण्याचे शुचिर्भूत साधन या गटांना चांगलेच अवगत झाले आहे.
असल्या गटांमधलाच एक अत्याधिक बोंबाबोंब गट आहे शाकाहारवाद्यांचा. शाकाहारवादी कोणत्या प्रकारे विज्ञानाची परिभाषा वापरतात आणि दिशाभूल कशी केली जाते हे पाहण्यासारखे आहे.
माणसाची शरीररचना मांसाहार करण्यासाठी योग्य नाही, माणसाची पचनसंस्था, दातांची रचना मांसाहाराच्या दृष्टीने निर्माण झालेले नाहीत हे त्यांचे सर्वात लाडके आग्र्युमेंट असते. शरीररचनेचा वैज्ञानिक विचार केल्याचे वरकरणी दर्शवून चालवलेले हे एक चकचकीत खोटे नाणे आहे.
शरीरशास्त्राची वैज्ञानिक माहिती असलेला कोणताही तज्ज्ञ असे विधान करणार नाही. केलेच तर तर्कनिष्ठा गहाण पडण्यासारख्या एखाद्या पगडय़ाखाली असेल तरच. एॅनिमल लिबरेशन फ्रंट नावाच्या एका दुकानाचे घोषवाक्यच आहे की ‘वी आर नॉट बॉर्न टु ईट मीट’. आपण मांस खाण्यासाठी जन्मलेलो नाही. ते आपले स्वाभाविक, निसर्गसंमत अन्न नाही असे शाकाहारवादी लोकांचे म्हणणे असते.
निसर्गसंमत म्हणजे नेमके काय? मानवाला इतर जीवांपेक्षा वेगळी बुद्धी निसर्गत: मिळाली. एकाच खाद्य वस्तूवर विविध संस्कार करून ती खाण्यायोग्य करण्याची बुद्धी माणसाकडेच आहे. आणि त्या निसर्गदत्त बुद्धीचा वापर करूनच मानवजात तगून राहिली. जे काही दात, दाढा, सुळे निसर्गत: मिळाल्या त्यांचे आताचे स्वरूप हे त्यांच्या वापरामुळे उत्क्रांत होत गेलेले स्वरूप आहे. माणूस आपल्या भोवतालातील प्रत्येक निसर्गदत्त सजीव वस्तूंमध्ये परिवर्तन करून ती खाऊ, पचवू शकतो. उष्ण कटिबंधातील माणसं अनेक शाक-अशाक वस्तू जल, अग्नि, शस्त्रसंस्कार, विविध रसांचा म्हणजे तिखट, खारट, आंबट, गोड, प्रसंगी कडू, तुरट चवींचा वापर करून खातात. मांस, मासे, अंडी वगैरेंप्रमाणेच धान्ये, कडधान्ये, भाज्या, फळे, मुळे, फुले खातानाही त्यांवर काही संस्कार करूनच खावे लागते. निवडणे, सोलणे, धुणे, भिजवणे, चिरणे, शिजवणे, तळणे, भाजणे हे संस्कार या सर्व शाक-अशाक द्रव्यांवर करावेच लागतात. शीत कटिबंधातील माणसं कमी जास्त प्रमाणात तेच संस्कार करतात.
अतिशीत प्रदेशातील एस्किमो आदि जमातींतील माणसे बर्फाळ हवेशी टक्कर देताना कच्चे मांस, कच्ची चरबीही खातात आणि त्यातून निर्माण होणारी ऊर्जा वापरतात.
दुसरे असे की माणसाची आतडी ही शाकाहारी प्राण्यांच्या आतडय़ांपेक्षा कमी लांब असतात. पूर्णपणे मांसाहारी प्राण्यांच्या आतडय़ांपेक्षा थोडी जास्त लांब असतात. शाकाहारी प्राण्यांच्या शरीरात असतात तशी तीन-चार जठरांची रचना माणसात नसते. रवंथ करण्याची रचनाही नसते. माणूस हा शाका तसेच मांस असे दोन्ही प्रकारातील अन्न घेऊ शकतो.
अशाक आहार घेणे किंवा मांसाहार करणे याचा अर्थ कुणीही शुद्ध अशाक आहार घेत नाही. शाकाहाराला प्राणिज पदार्थाची किंवा पशुपक्ष्यांचे मांस, जलचर, उभयचरांचे मांस यांची जोड असते. भात, भाकरी, पोळी, पाव, भाज्या, उसळी, कोशिंबिरी यांच्या जोडीला मांसाहार केला जातो. छान मजेत माणूस मांसाहार घेतो. दातांनी सुळ्यांनी तोडतो, चावतो, दाढांखाली रगडतो आणि त्याचं जठर, आतडी इतर सहाय्यक इंद्रिये आपापले पचवण्याचे काम यथास्थित करीत असतात.
संस्कृतीच्या युगप्रवासात पाककला प्रगत झाली त्याला कारण होती माणसाची निसर्गदत्त बुद्धी, निसर्गदत्त शरीररचना- पचनसंस्था आणि काय आवडतंय हे कळवणारी रसना. शरीराला काय नको हे कळवण्यासाठी आजारी पडणारं शरीर आणि त्यापासून बोध घेऊन आहारात बदल करण्याची अक्कल हे सारं निसर्गदत्त होतं. मग ते निसर्गसंमत नसण्याचा प्रश्नच कुठे येतो.
दुसरा मुद्दा पुढे केला जातो तो क्रौर्याचा. तर्कनिष्ठेला, अनुभवसिद्ध ज्ञानाला खुंटीला टांगून केवळ आपलीच भावना श्रेष्ठ मानणाऱ्यांनी अशाक आहार घेणारांना क्रूर ठरवून स्वत:च्या माथ्यावर संवेदनशीलतेचा किरीट ठोकून बसवला तरीही असले खुळचट मत मनावर घेण्याची गरज नाही.
अनेक लोक आपण संवेदनाशील, भावनाप्रधान असल्याचा उपयोग शस्त्रासारखा करतात. आपल्यासारखे नसलेले इतर लोक खालच्या प्रतीचे आहेत हे दाखवण्यासाठी, नैतिकदृष्टय़ा आपण श्रेष्ठ आहोत म्हणून आपल्या मताला प्राधान्याने सर्व संमती मिळालीच पाहिजे हे ठसवण्यासाठी या भावनाप्रधानतेचा वापर होतो.
पण बुद्धीनिष्ठ परिशीलनातून स्पष्ट झालेले सत्य कळले असेल तर असल्या भावनाप्रधान, वेडगळ श्रद्धांबद्दल काडीइतकाही आदर दर्शवणे चूक ठरेल. किंबहुना असल्या उद्योगांना सज्जनता म्हणून थोडाही आदर दाखवल्यास त्यांच्या शस्त्रांना धार चढते. काही काळानंतर त्यातूनच भावना दुखावण्याचे राजकारण सुरू होते. अशाक खाणे म्हणजे जीवहत्या, मांसाहार म्हणजे क्रूरता असे मानण्याच्या भ्रामक समजुतीवर या भावनांचा डोलारा आधारित आहे. शाका म्हणजे सजीव नाहीत असे मानणे हे मध्ययुगातील अडाणी माणसाचे मत असू शकते.
तसे पाहता धान्य खाणे म्हणजे एका अर्थी भ्रूणहत्याच. जीवनशक्ती निद्रिस्त असलेल्या भ्रूणासारख्या त्या बिया दोन दगडांमध्ये दळल्या जाताना, उकळत्या पाण्यात रटरटताना, गरम कढईत पडताना त्यांच्या वेदनांचा ध्वनी उमटत नाही म्हणून त्यांना वेदना होत नाहीत असे गृहीत धरणे सोयिस्कर पडते एवढेच. ऊब मिळते आहे, पाणी मिळते आहे अशा जाणिवेने कडधान्यांच्या बिया अंकुरायला लागतात, वाढण्याच्या तयारीला लागतात.. त्यांची जिजिविषा अशी जागवून त्यांना फोडणीत परतून खाणे ही क्रूर जीवहत्या नाही? उगवलेले कोवळे झाड उपटून त्याची पाने चिरणे, फळ जून झालेले नसताना, अगदी कोवळेच आहे असे पाहून ते चिरणे ही काय क्रूरता नाही? या सर्व निर्विवादपणे जीवहत्याच आहेत. आणि शुद्ध शाकाहारी म्हणवणाऱ्या लोकांना त्या करणं भाग आहे. कारण माणूस दगड मातीसारखे निर्जीव पदार्थ, रसायने, धातू खाऊन जिवंत राहू शकण्याइतका अजूनतरी उत्क्रांत झालेला नाही. भावनांचेच भांडवल करायचे तर मग या जीवहत्यांचाही विचार जरूर व्हावा आणि प्रायोपवेशन करून आत्महनन करून मोकळे व्हावे. मोक्षच. कसे?
निसर्गचक्र चालताना त्यात ज्या प्रमाणात साहचर्य आहे तितक्याच प्रमाणात क्रौर्यही आहे. अर्थात् साहचर्य, क्रौर्य ही जे घडते त्याला माणसाने दिलेली विशेषणे आहेत. खरे तर तो एक केवळ अटळ असा सृष्टीक्रम आहे. प्रत्येक जीव त्याच्या त्याच्या गुणसूत्रांनुसार, जनुकांनुसार वागतो, जगतो. त्यात नैतिकतेच्या तत्त्वांचा प्रश्न नसतो. जगणे हीच एक नैतिकता असते. अन्नाच्या बाबतीत माणूसही याच नैतिकतेचे तत्त्व पाळत आला आहे. स्वग्रह- संवर्धनाच्या नव्या जाणिवांमुळे आपण जीववैविध्य नष्ट होऊ नये म्हणून ‘खाद्य’ जीव, ‘अखाद्य’ जीव असा फरक करू लागलो आहोत. यात पशुपक्ष्यांच्या जोडीने वनस्पतीही येऊ शकतात. मांसाहार प्रिय असलेल्या सर्व व्यक्ती दुर्मिळ झालेल्या जीवांची शिकार करून खातात असेही नाही. असला आततायीपणा करणाऱ्या व्यक्तींचे वर्गीकरण शाकाहारी किंवा मांसाहारी असे न होता निर्बुद्ध, लोभी, लालची एवढेच करता येईल.
शाकाहारी असलेल्या अनेक व्यक्ती दुर्मिळ जीवसृष्टीच्या काळ्या बाजारात तसेच इतर अनेक काळ्या व्यवहारांतही असतात हे भारतातल्या कुणाला वेगळे सांगायला नकोच! आणि आवडीने कोंबडी, बकरी, मासे खाणाऱ्या अनेक व्यक्ती आपला परिसर, आपली सृष्टी आणि आपला समाज निरोगी राहावा म्हणून तळमळीने काम करताना दिसतात. सुष्टत्वाचे आणि दुष्टत्वाचे नमुने कोण काय आहार घेतो यावरही अवलंबून नसतात. शाकाहार म्हणजे सात्विक आहार, मांसाहार म्हणजे तामसी आहार असा एक लोकप्रिय गैरसमज आहे. वनस्पतींची जीवहत्या सात्त्विक आणि प्राणीजीवहत्या तामसी हा एक लटका फरक आपण नाहकच करून ठेवला आहे.



-------- लोकसत्ता



7 comments:

  1. बिनधास्त चोऱता दुसऱ्यांचे लेख. वाहवा!

    ReplyDelete
  2. किती चोऱ्या... पोलीस तक्रार करू का रे तुझी? हा लेख मुग्धा कर्णिक यांचा आहे.

    ReplyDelete
  3. सारेच आर्टिकल्स ह्याने इथून तिथून उचललेलेच आहेत ..... :D
    आणि हा प्रामाणिक आहे अस तो लिहितो ...पण कृती ???

    ReplyDelete
  4. राजूला मी धन्यवाद देतो त्यांच्यामुलेच मुग्धाताईचे लेख वाचायला मिळाले

    ReplyDelete
    Replies
    1. अस करून तुम्ही चोरीला पाठिंबा देताय. This is not a good sign...

      Delete
    2. अस करून तुम्ही चोरीला पाठिंबा देताय. This is not a good sign...

      Delete
  5. चोरी केलीय आणि वर फोटू टाकलेत जेवणाचे....आचारी आहे वाटत व्यवसायाने....

    ReplyDelete