Tuesday 6 March 2012

मटण स्पेशल





हिरवा मटण भात
साहित्य : ४ वाटी भिजलेले तांदूळ, अर्धा किलो- मटण, २ वाटय़ा कोथिंबीर, ४ ते ५ हिरव्या मिरच्या, ५ ते ६ काळीमिरी, २ वेलची, तमालपत्र, अर्धा चमचा शहाजिरे, अर्धा कप दही, १ लिंबाचा रस, २ चमचे पुदिना, ४ मोठे चमचे तेल, २ मोठे कांदे उभे चिरलेले, अर्धा चमचा हळद , १ चमचा आलं-लसूण पेस्ट,
२ उकडलेली अंडी, मीठ चवीनुसार.
कृती : मटणामध्ये मीठ व हळद टाकून कुकरमध्ये ४ शिटय़ा करून घेणे. एका मोठय़ा पातेल्यामध्ये तेल टाकून त्यात शहाजिरं, वेलची, दालचिनी, काळीमिरी टाकावी. खडा मसाला भरून झाल्यानंतर त्यात कांदे लालसर परतून घ्यावेत. मिक्सरमध्ये आलं-लसूण पेस्ट, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या वाटून ते मिश्रण त्या पातेल्यात टाकणे. दोन ते तीन मिनिटे हे मिश्रण परतल्यानंतर त्यात तांदळाच्या दुप्पट पाणी टाकणे. हे मिश्रण उकळल्यानंतर त्यात केवळ भिजलेले तांदूळ, फेटलेले दही, बारीक चिरलेला पुदिना, लिंबाचा रस टाकून भात शिजून ठेवणे. भात अर्धा शिजल्यानंतर त्यात शिजलेले मटण टाकणे. भात शिजत आल्यानंतर गॅसवर तवा गरम करणे व मंद आचेवर झाकण लावून भात मुरायला ठेवणे. दहा मिनिटानंतर गॅस बंद करणे. उकडलेल्या अंडय़ाने भात गार्निश करणे.
बटर चिकन
साहित्य : अर्धा किलो बोनलेस चिकन, २ चमचे आलं-लसून पेस्ट, २ चमचे तंदुरी मसाला, २ चमचे लाल मिरची पावडर, अर्धा किलो फेटलेले क्रीम, २ मोठे चमचे अमूल बटर, २ चमचे दही, ४ ते ५ टोमॅटोची प्युरी,
मीठ चवीनुसार, २ चमचे काजूची पेस्ट, अर्धा चमचा गरम मसाला पावडर.
कृती : बोनलेस चिकनचे एक एक इंचाचे तुकडे कापून स्वच्छ धुऊन घेणे. त्यामध्ये आलं-लसून पेस्ट, मीठ, मिरची पावडर, दही, तंदुरी मसाला लावून अर्धा तास मुरायला ठेवणे. एका पॅनमध्ये बटर टाकून त्यात वरील मिश्रण परतून घेणे. थोडे परतल्यावर त्यात टोमॅटो प्युरी टाकून पंधरा मिनिटे शिजवावे, चिकनमधील पाणी कमी झाल्यानंतर त्यात क्रीम, काजूची पेस्ट व गरम मसाला टाकून दोन ते तीस मिनिटे शिजवणे. गरम गरम सर्व करणे.
चिकन ६५ (सिक्स्टी फाइव्ह)
साहित्य : अर्धा किलो बोनलेस चिकन, २ चमचे आलं-लसूण पेस्ट, २ चमचे लाल तिखट, अर्धा कप कढीपत्ता, ४ ते ५ कमी तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या, १ मोठा चमचा तूप, १ चमचा सोया सॉस, १ चमचा कॉर्न फ्लॉवर (सफेद), १ चमचा टोमॅटो केचप, १ चमचा तंदुरी मसाला, चिमूटभर खायचा लाल रंग, चवीनुसार मीठ.
कृती : चिकन मध्यम आकारात कापून स्वच्छ धुवून घेणे. चिकनमध्ये आलं-लसण पेस्ट, लाल तिखट, मीठ, तंदुरी मसाला, खायचा लाल रंग मिक्स करून पंधरा ते वीस मिनिटे हे मिश्रण मुरायला ठेवणे. एका कढईत साजूक तुपामध्ये कढीपत्ता तळून घेऊन बाजूला ठेवणे. त्याच तुपामध्ये मुरवत ठेवलेले चिकन परतून घेणे. पंधरा ते वीस मिनिटानंतर अर्धा कप थंड पाण्यामध्ये मिक्स केलेले कॉर्न फ्लॉवर व सोया सॉसचे मिश्रण त्यात टाकणे. टोमॅटो केचअप, तळलेला कढीपत्ता, उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाकून चांगले परतून घेणे. पाच मिनिटांसाठी झाकण लावून ठेवणे व गरम गरम सव्‍‌र्ह करणे.
काळीमिरीचे मटण
साहित्य : अर्धा किलो मटण, १ वाटी दही, १ वाटी कच्च्या कांद्याची पेस्ट, पाव वाटी पुदिना
अर्धी वाटी कोथिंबीर, १ चमचा हळद, १ चमचा काळीमिरी, २ लवंग, १ दालचिनीचा तुकडा, १ चमचा तेल, ४ ते ५ हिरव्या मिरच्या, १ चमचा आलं-लसूण पेस्ट, मीठ चवीनुसार.
कृती : मटण स्वच्छ धुवून त्याला हळद, मीठ लावून तेलामध्ये उकडून घेणे. एका कढईत तेल गरम करून त्यात कांद्याची पेस्ट तांबूस लालसर होईपर्यंत परतणे. काळीमिरी, पुदिना, हिरव्या मिरच्या, लवंग- दालचिनी आलं-लसूण पेस्ट, कोथिंबीर मिक्समध्ये वाटून घेणे. हे सर्व मिश्रण परतलेल्या कांद्यामध्ये घालून शिजवणे. दोन ते तीन मिनिटे हे मिश्रण परतल्यानंतर त्यात फेटलेले दही टाकणे. हे मिश्रण शिजत आल्यानंतर त्याचे भांडय़ाच्या कडेला तेल सुटते त्यावेळेस शिजलेले मटण टाकून दहा मिनिटे शिजवावे. गरम गरम सर्व करणे.
मेथी मटण
साहित्य : अर्धा किलो मटण, २ वाटय़ा मेथीची भाजी, ४ मोठे कांदे (उभे चिरलेले), १ वाटी ओल्या खोबऱ्याची पेस्ट, १ चमचा आलं-लसूण पेस्ट, २ मोठे बारीक चिरलेले टोमॅटो, २ चमचे लाल तिखट, १ चमचा धणे पावडर, २ मोठे चमचे तेल, १ चमचा गरम मसाला (लवंग, वेलची, दालचिनी), मीठ चवीनुसार.
कृती : एका कुकरमध्ये तेल गरम करणे. त्यात कांदे खरपूस तळून घेणे. धुतलेल्या मटणामध्ये हळद व मीठ लावणे. परतलेल्या कांद्यामध्ये मटण, टोमॅटो, बारीक चिरलेली मेथीची भाजी, टाकून पाच मिनिटे शिजवणे. नंतर आलं-लसूण पेस्ट, लाल तिखट, गरम मसाला, ओल्या खोबऱ्याची पेस्ट टाकून मिश्रण चांगले परतणे. दोन वाटय़ा पाणी टाकून कुकरच्या सहा ते सात शिटय़ा करणे. गरम गरम सर्व करणे.





No comments:

Post a Comment