Tuesday 6 March 2012

स्तनपान काही समज आणि गैरसमज


 




मातेचे दुध हे बाळाचे पहिले अन्न असून ते बाळाकरीता संपुर्ण आहार आहे. बाळाला योग्य वयात व पुरेशा प्रमाणात मातेचे दुध मिळाले नाही तर ते अनेक आजारांना वारंवार बळी पडते. बाळाची रोग प्रतिकारक शक्ती कमी होते त्यामुळे बाळाला कुपोषण व अनेक गंभीर आजारांना तोंड द्यावे लागते. जंतूसंसर्ग श्‍वसनाचे आजार व इतर आजार कुपोषित असलेल्या बाळांना मोठया प्रमाणात होतात व प्रसंगी मूत्यूही ओढावू शकतो. बाळ जन्मानंतर स्तनपान शक्य तितक्या लवकर सूरू करावे. सामान्य प्रसूतीनंतर अर्ध्या तासाच्या आत तर सिजेरियन नंतर चार तासाच्या आत स्तनपान सूरू करावे. बाळाला मातेच्या दुधाव्यतीरिक्त सुरूवातीचे चार महिने तरी दुसरे काही देवू नये.पाणी सुध्दा देवू नये. आपल्याकडे बाळ जन्मल्यानंतर स्तनपान करण्यापूर्वी मध, गुळ आदी चाटण देण्याची प्रथा आहे ती प्रथा चुकीची असून त्यामुळे जंतु संसर्ग होण्याची शक्यता असते. बाळाच्या निकोप वाढीकरीता मातेचे दुध देणेच योग्य आहे.


‘स्तनपान हाच बाळासाठी सर्वोत्तम आहार होय. परंतू काही आरोग्यविषयक तक्रारी असल्यास किंवा पहिलटकरणींना पुन्हा त्यांच्या कामास सुरूवार करायची असल्याने त्यांना बाळाला पुरेसे स्तनपान करता येत नाही. अशावेळी काही माता बाटलीतील दुधाची मदत घेतात. ज्या बायका मुलांना अंगावर दुध पाजतात. त्यांना दररोज किमान ५०० कि. ग्रॅ. कॅलरीजचे गरज असते. या शिवाय ४०० मि. ग्रॅ. कॅल्शियम व २० ग्रॅम प्रथिने तिला मिळालीच पाहिजेत त्यासाठी तिच्या आहारात दुध, दुधाचे प्रदार्थ, अंडी मांस, व ब्रेड मिळालेच पाहीजेत. तसेच ती जेवढ्या प्रमाणात पाणी पिईल तेवढ्या प्रमाणात तिला जास्त दुध सुटेल.


काही ग्रामीण भागात जन्मानंतर तीन दिवसापर्यंत बाळाला अंगावरचे दुध पाजले जात नाही या पहिल्या दिवसातील आईचे दुध चिकट व पिवळे असल्याने नष्ट केले जाते. परंतू आईच्या याच दुधात बाळाला उपयुक्त असे अन्न घटक व भरपूर प्रमाणात जिवनसत्व मिळतात. बाळाला पहिल्या चार महिन्यापर्यंत रोग प्रतिकार शक्ती उत्तम राखण्यास या दुधाने मदत होते. बाळाला स्तनपान लवकर सुरू करण्याने आई व बाळात भावनिक नाते निर्माण होते ही बाळाच्या विकासाची व शिक्षणाची पहिली पायरी आहे. स्तनपानामूळे बाळाच्या जबडयाची सुध्दा चांगली वाढ होते.


प्रसूतीनंतर आईचा रोजचा आहार सुधारण्याची गरज आहे. आईला दूध येत असेल आणि बाळाचे पोट भरत नसेल  तर शतावरीसारखी आयुर्वेदिक औषधे तसेच काही अ‍ॅलोपॅथिक औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याने घेता येतील. मात्र, तरीही आईने ठरावीक अंतराने पौष्टिक आहार घेणे हाच सर्वोत्तम उपाय आहे.


लहान मुलांना स्तनपानाच्या वेळी मातेच्या चेहऱ्यावर चिंतेचे भाव पटकन कळतात. यावेळी शक्यतो वातावरण आनंदी ठेवावे. कुटुंबाच्या हिताचे निर्णय पालकांनी वेळीच घेणे महत्वाचे असते. मुलाला दुग्धपान करण्यासाठी कोणतीही पध्दत वापरली तरी त्यावेळी आजुबाजुला आनंदी वातावरण हवे. स्तनपान करताना मातेने एखादे गाण गुणगुणावे, थोपटावे किंवा बाळाशी वातावरण खेळते ठेवावे. या प्रेमळ स्पर्शाशिवाय मुलांची योग्य वाढ विकास हो‍उ शकत नाही. घन पदार्थाचा आहार देताना घ्यायची काळजी: घन आहार देताना असे सुचविले जाते की मुल ४ ते ६ महिन्यांचे होई पर्यंत थांबावे. तोपर्यंत मुलाला मान सांभाळता येते व ते ताठ बसु शकते. यामुळे ते चमच्याने भरवलेले पदार्थ नीट ग्रहण करू शकते. ४ ते ६ महिन्यांनंतर मुलांना घन पदार्थातील पोषण मुल्यांची अधिक गरज भासते. या वेळेपर्यंत त्याचे वजन दुप्पटिने वाढलेले असते व त्यांची अन्नाची गरजही वाढलेली असते. स्तनाग्रे आत वळलेली असल्यास, थोड्या प्रमाणात असल्यास उपाय करता येतात, पण स्तनाग्रे पूर्णपणे आत असतील तर ब्रेस्ट पंपाचा वापर करावा लागतो. प्रसूतिपूर्व तपासणीतच याचे निदान होणे आवश्यक असते. स्तनांमध्ये ताठरपणा व वेदना असल्यास, स्तनांमध्ये दूध जास्त साठून राहिल्यास स्तन घट्ट, ताठर होतात. आईला खूप दुखते व थोडा तापही येतो. हलक्या हाताने मसाज करून व गरम पाण्याने शेकून दूध काढून टाकावे लागते. दूध साठून राहिल्यास व त्यात जंतुसंसर्ग झाल्यास गळू होऊ शकते. शस्त्रक्रिया करून हे गळू काढून टाकावे लागते. यामध्ये वेदनाही खूपच जास्त होतात. तसेच गळू पूर्ण भरून येईपर्यंत त्या बाजूने दूधही देता येत नाही. गळू न होण्यासाठी दर थोड्या वेळाने स्तन रिकामे होणे व जास्त प्रमाणात दूध साठू न देणे हे खबरदारीचे उपायच महत्त्वाचे ठरतात. योग्य पद्धतीने स्तनाग्रे बाळाच्या तोंडात न दिल्यास स्तनाग्रांना भेगा पडू शकतात. यामध्ये खूपच वेदना होतात. योग्य पद्धत अनुभवी व जाणकार व्यक्तीकडून पहिल्या वेळीच शिकून घेणे चांगले. कधी-कधी बाळाला आईचे स्तनपान करता येत नाही आणि कृत्रिम स्तनाग्राने स्तनपान द्यावे लागते. हे रबराचे/प्लास्टिकचे निप्पल खूप मऊ असते.  एकदा त्याची सवय झाली की बाळ नैसर्गिक स्तनपान करताना रडते.  आईचा आळशीपणा/नाराजी/अज्ञान, आईचे मानसिक आरोग्य योग्य नसणे. उदा. चिडचिडेपणा, काळजी, चिंता. आईला आॅपरेशननंतर दुखत असणे, आईला वेगवेगळ्या प्रकारचे आजार असणे. स्तनाच्या तक्रारी :- उदा. दुधाची गाठ होणे, स्तनाग्राला भेग पडणे, यामुळे पुरेसे स्तनपान होण्यात अडचणी येतात. अपुºया दिवसांचे बाळ योग्य पद्धतीने दूध ओढून घेऊ शकत नाही. बाळाला काही काळ आजार झाल्यास. बाळाच्या तोंडाच्या रचनेत दोष असणे.आईला एचआयव्ही असणे इत्यादी.

स्तनपान देणाºया मातेचा आहार :

मातेने सकस, ताजा, सर्व अन्नघटकांचे योग्य प्रमाण असलेला आहार घेणे चांगले. आईने स्वत: दररोज अर्धा ते पाऊण लिटर दूध सेवन करावे. (2-3 कप / 24 तासात). द्रव पदार्थ भरपूर घ्यावेत. काही जणांची अशी समजूत असते की खूप जास्त मेद असलेला आहार चांगला. (हाय अमाउंट आॅफ फॅट्स) परंतु जर हे प्रमाण अति असेल तर आईचे वजन प्रमाणाबाहेर वाढू शकते. सर्व जीवनसत्त्वे, खनिजे व लोहयुक्त आहार घ्यावा. अळीव, डिंक, खसखस इ. अन्नघटकांमुळे दूध जास्त प्रमाणात येण्यास मदत होते.

बाळाला स्तनपान पुरेसे आहे का?

दोन स्तनपानांच्या मधल्या काळात बाळ शांत झोपत असेल, सारखे रडत नसेल, दिवसातून 10-12 वेळा शू करत असेल, तर सर्वसाधारणपणे असे म्हणता येईल की बाळाला स्तनपान पुरेसे मिळत आहे. जन्मानंतर 15 दिवसांनी बाळाचे वजन केल्यावर ते वजन जन्मत: असलेल्या वजनाएवढे किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर आईचे दूध बाळाला पुरेसे आहे. तीन महिन्यांपर्यंत दररोज बाळाचे वजन 25-30 ग्रॅम वाढत असल्यास स्तनपान पुरेसे आहे. काही वेळा बाळाला आईचे दूध देता येत नाही. गाईच्या दुधातील बरेचसे घटक आईच्या दुधासारखे असतात.



‘कॅसिनोजेन’ या एका घटकामुळे काही जणांना डायरिया होतो. दूध उकळल्यावर ही शक्यता कमी होते. उकळलेले पाणी घालून थोडे पातळ केलेले गाईचे दूध हा आईच्या दुधाच्या जवळपास जाणारा पर्याय आहे. बाजारात   अनेक प्रकारच्या दुधाच्या पावडरी मिळतात. प्रत्येकातील घटकांचे प्रमाण वेगवेगळे असते. वैद्यकीय सल्ल्यानुसार बाळाच्या आहाराच्या गरजेनुरूप त्याचा वापर करता येतो. मात्र यांची किंमत परवडेलच असे नाही.

बाळाला ढेकर काढणे- स्तनपानाच्या वेळी बाळाच्या तोंडावाटे पुष्कळ हवा पोटात जाते. स्तनपान झाल्यावर ही हवा आपोआप बाहेर येते व त्याबरोबर थोडे दूधही बाहेर येते. खांद्यावर बाळाला उभे धरून ही हवा प्रत्येक स्तनपानानंतर बाहेर काढायला मदत करणे अत्यावश्यक असते.






No comments:

Post a Comment