Wednesday 28 March 2012

मांसाहार हाच नैसर्गिक आहार - भाग २






हा जुना वाद शास्त्रीय पध्दतीने तपासला पाहिजे.पशुपक्ष्यांची हत्या झाल्यानंतर त्यांचा जीवनरस म्हणजे रक्त आपल्याच रक्ताच्या रंगाचे असल्यामुळे कीव वाटणे किंवा घृणा वाटणे या दोन भावना उचल खाण्याचे प्रमाण जास्त असते. भाजी कापल्यावर, फळे चिरल्यावर वाहणारा वनस्पतींचा जीवनरस अशा भावना चेतवू शकत नाही, याचे कारण त्यांचे जीव म्हणून आपल्याशी गुणसाधम्र्य नसते. पावित्र्यासंबंधी असलेले आंधळे धार्मिक समज मनात असल्यामुळे मांसाहारी व्यक्तींमध्ये कधीकधी नाहकच न्यूनगंड किंवा अपराधी भावना निर्माण होते. संभ्रम निर्माण होतो. असल्या संभ्रमित दुबळेपणाचा फायदा ज्याप्रकारे भोंदू बुवा-बापू घेतात त्याचप्रकारे शाकाहारवादीही घेऊ पाहतात.
 शाकाहाराचा प्रचार करण्याचे व्रत घेतलेल्या संस्था आजकाल सॅच्युरेटेड फॅटस्, पॉलि-अनसॅच्युरेटेड फॅट्स, कोलेस्टेरॉल, ओमेगा ६, ओमेगा ३, अँटिऑक्सिडंटस् या अन्नघटकांसंबंधाने मांसाहाराच्या संदर्भात बेधडक
विधाने करत असतात. आरोग्य हा त्यांचा आणखी एक लाडका मुद्दा. मधुमेह, हृदयविकार, रक्तदाब, आतडय़ांचे विकार, कर्करोग अशा  अनेक विकारांना सामोऱ्या जाणाऱ्या लोकांना आधीच धसका बसलेला असतो. त्यात अशी दणकावून केलेली, आकडे फेकणारी विधाने त्यांनी ऐकली की परिणाम साधतोच. शुद्ध शाकाहारी लोकांचे आयुर्मान मांसाहार घेणाऱ्या लोकांपेक्षा किमान नऊ वर्षांनी तरी अधिक असते असा एक एकजात खोटा प्रचार केला जातो.
अगदी अलीकडेच मेरीलँड युनिव्हर्सिटीतील पेडिएट्रिक्स, मेडिसिन आणि फिझिऑलॉजीचे प्राध्यापक डॉ. अ‍ॅलिसिओ फॅसॅनो आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेले संशोधन सायंटिफिक अमेरिकनच्या ऑगस्ट २००९ च्या अंकामध्ये प्रसिद्ध झाले आहे. शेतीची कला अवगत झाल्यानंतर माणसाचा फळे, मुळे, पशुपक्ष्यांचे मांस हा प्राथमिक आहार बदलला. हे अन्न शोधण्यासाठी करावी लागणारी भटकंती थांबली. एका ठिकाणी राहून निश्चितपणे अन्न मिळवण्याचे शेतीचे तंत्र अवगत झाले आणि धान्यबियांचे आहारातील प्रमाण वाढले. त्यानंतरच माणसाला गहू, बार्ली, राय या धान्यांमधील ग्लुटेन या प्रथिनामुळे यापूर्वी होत असलेले आतडय़ाचे विकार होऊ लागले असे त्यांचे निरीक्षण आहे. आतडय़ाच्या विकारांनी जगातील केवढीतरी लोकसंख्या त्रस्त आहे. ग्लुटेनयुक्त आहार कमी करावा असे सुचवताना ग्लुटेनच्या या दुष्परिणामांवर उत्तर शोधण्यासाठी त्यांचे पुढील संशोधन सुरू आहे. त्यांनी काही उत्तरे मिळवलेलीही आहेत. गहू, बार्ली, राय हा शुद्ध शाकाहार असूनही त्याचे काही दुष्परिणाम आहे. म्हणून काही गहू खाण्याचे कुणी सोडून देणार नाही. शिजवण्याच्या सर्वोत्तम पद्धती कोणत्या ते शोधायच्या कामाला माणूस लागेल. त्यातील दोष कसे कमी करावेत ते शोधण्यामागे अनेकांची बुद्धी धावू लागेल. माणसाने विकसित केलेल्या अनेक आहारद्रव्यांमध्ये, अन्नसंस्कारांमध्ये दोषकर आणि दोषशामक असे विशेष असतातच. आयुर्वेदाने तर पथ्यकर काय, दोषकर काय याचा तपशीलवार
अभ्यास नोंदला आहे. त्याबद्दल लोकांना माहिती देण्याऐवजी एकांगी प्रचार करण्याने कुणाचे कल्याण साध्य होते? काहीजणांची स्वत:बद्दलची श्रेष्ठत्वाची भावना गोंजारली जाण्यापलीकडे यातून काहीही साध्य होत नाही. शाकाहारी लोक अधिक निरोगी राहतात या दाव्याची शहानिशा कुणी केली आहे का? निरोगीपणाच्या कारणांचा अभ्यास करायचा तर त्यात आहाराव्यतिरिक्त कित्येक मुद्दे लक्षात घेऊन संशोधन करावे लागेल. त्यात जीवनशैली, आहार-विहार, देशमान, हवामान, जलस्रोत, व्यसने किंवा त्यांचा अभाव, अन्नाचा दर्जा, अभाव, वैपुल्य असे किती तरी अभ्यसनीय मुद्दे- व्हेरिएबल्स असतील.
मांसाहारी लोक काही शुद्ध मांसाहारी नसतात. शाकाहाराला मांसाची जोड असते. मांसामधून जी आठ अमायनो अ‍ॅसिडस् मिळतात, जीवनसत्वे मिळतात, लोह, जस्त, कॅल्शियम ही द्रव्ये मिळतात ती सारी आरोग्याला मारक आहेत असा एक गैरनिष्कर्ष यातून काढला जाऊ शकतो. शुद्ध शाकाहारामुळे आरोग्यप्राप्ती होते हे अनभ्यस्त, असत्य विधान प्रचारकी थाटाला शोभेसे आहे. आरोग्यशास्त्र आणि पोषणमूल्यांचा अभ्यास करणाऱ्या अधिकांश तज्ज्ञांनी या प्रचाराला आक्षेप घेतला आहे.
पण आज या धर्माधिष्ठित शाकाहार प्रचाराला फॅशनची साथ मिळाली आहे. अनेक प्रश्नांवर लोक चालू फॅशनच्या चौकटीत बसणारी मते चटकन स्वीकारतात.  केवळ बुद्धिनिष्ठा ग्राह्य़ धरून सत्य आणि सत्यच स्वीकारण्याचे धैर्य दाखवणारे नेहमीच अल्पमतात असतात.  आता आपण आरोग्यकारक घटकांचे काही तपशील पाहू. शाकाहारवादी प्रचारक असे सांगतात की, ‘बी१२’ हे जीवनसत्त्व शाकाहारी आहारातून मिळू शकते. काही शैवाले, सोयाबीन्स आंबवून मिळणारे टेंपी, यीस्ट हे कवक यातून ‘बी१२’ हे जीवनसत्त्व लाभते हा त्यांचा दावा पूर्णत: खोटा आहे. हे जीवनसत्त्व जरी त्या वनस्पतींमध्ये असले तरीही त्या गोष्टी आपण खाल्ल्यानंतर आपल्या शरीराला उपलब्ध होत नाही हे सांगितले जात नाही किंवा प्रचारक त्याबाबत अज्ञानी असावेत. स्पिरुलिना, टेंपी वगैरेंना आहारात समाविष्ट करून वैद्यकीय चाचण्या घेण्यात आल्या आहेत आणि त्यात ते घटक परिणामकारक ठरत नसल्याचे सिद्ध झाले आहे. यीस्टमध्ये तर नैसर्गिक स्वरूपातील ‘बी१२’
नसतेच. ते केवळ बाहेरील घटकद्रव्यांशी संयोग पावल्यानंतरच तयार होते. मांसाहाराला पर्याय म्हणून सुचविण्यात आलेल्या सोयाबीनची एक तिसरीच कथा आहे. सोयाबीन उत्पादने करणाऱ्या बडय़ा कंपन्यांचा प्रचार काहीही असो. सोयाबीन हे धान्य काही फारसे श्रेष्ठ धान्य नाही. त्यातील प्रथिनघटक पचवण्यास सोपे नाहीत. शिवाय सोयाबीनच्या सेवनामुळे अनेक लोकांना थायरॉइडचा त्रास होतो हे सिद्ध झालेले आहे.
काही प्रचारक तज्ज्ञ सांगतात, आतडय़ातील काही बॅक्टेरियाच बी१२ तयार करतात. तसे तर आहेच. पण तेथे तयार झालेले बी१२ शरीराला लाभत नाही त्याचे काय. बी१२ शरीराला मिळण्यासाठी त्याचे पचन जठरात व्हावे लागते. देशाच्या काही प्रदेशातील शाकाहारी लोकांमध्ये बी१२ जीवनसत्त्वाची कमतरता आढळून येत नाही म्हणून कदाचित असा निष्कर्ष काढला गेला असेल. पण या प्रदेशात कीटकनाशकांचा वापर नसल्यामुळे तेथील शाकाहारात कीटकांची सूक्ष्म अंडी असू शकतात, त्यातून त्यांना प्रथिने मिळत असतील. (कीटक आणि त्यांची अंडी ही भविष्यातील प्रथिनाचा पुरवठा असू शकतात, अशा एका भाकिताची येथे आठवण होते.)
शरीराला सहजपणे शोषून घेता येईल असे बी१२ जीवनसत्त्व केवळ प्राणिज्य पदार्थातून मिळू शकते हे सत्य आहे. लिव्हर, अंडी यातून ती सर्वात जास्त मिळतात. दुग्धजन्य पदार्थातून थोडय़ा कमी प्रमाणात मिळतात. काही शाकाहारी लोक दूध आणि अंडीही आहारातून वगळतात. अंडी खाल्ल्यामुळे कोलेस्टेरॉल वाढते याचाही जो अवाजवी बाऊ करण्यात आला आहे, त्यामुळेही अनेकजण अंडी खाणे टाळतात.परिणामी बी१२ ची कमतरता निर्माण होते आणि त्यातून अंतिमत: पंडुरोग (अ‍ॅनिमिया) जडतो. आजकाल बी१२ च्या पूरक गोळ्या उपलब्ध आहेत म्हणून ठीक नपेक्षा हट्टाग्रही शाकाहारींच्या प्राणाशी गाठ होती, खरे म्हणजे बी१२ च्या कमतरतेचा एकच मुद्दा शाकाहाराच्या आरोग्य प्रदतेच्या मुद्दय़ाचा खातमा करू शकतो. ओमेगा ३ आणि ओमेगा ६ ही फॅटी अ‍ॅसिडस् म्हणजे लिनोलेनिक आणि लिनोलिइक ही पॉलिअनसॅच्युरेटेड मेदाम्ले
आहारातूनच आपल्याला मिळतात. शरीर स्वत: ती तयार करू शकत नाही. अत्यल्प प्रमाणात ओमेगा ३ पालेभाज्या आणि धान्ये यातून मिळत असले तरी प्रामुख्याने त्याचा पुरवठा मासे आणि अंडी यातूनच होतो. ओमेगा ६ हे बव्हंशी भाज्यांमधून मिळते आणि अल्प प्रमाणात काही प्राण्यांच्या चरबीतून मिळते. शाकाहारी लोकांची समजूत पटविण्यासाठी शाकाहाराचे प्रचारक सांगतात की, आपले शरीर ओमेगा ६ पासून ओमेगा ३ पर्यंत गरज पडेल तसे रूपांतरित करू शकते. असे होऊ शकत नाही असे मेरीलँड विद्यापीठाच्या संशोधक डॉ. मेरी एनिग यांनी सप्रयोग सिद्ध केले आहे. ओमेगा ६ मेदाम्ले थोडय़ा वेगळ्या मेदाम्लांची निर्मिती करतात, तसेच ओमेगा ३ चेही आहे. पण ओमेगा ६ चे ओमेहा ३ किंवा उलट होऊ शकत नाही. मेंदूची कार्यक्षमता आणि रोगप्रतिकारक शक्तीची क्षमता चांगली राहावी म्हणून ओमेगा ३ प्रकारातली मेदाम्ले अत्यावश्यक असतात.
भाज्यांतून मिळणारी ओमेगा ६ प्रकारातील मेदाम्ले अत्याधिक प्रमाणात पोटात गेल्याने नुकसानच होते. त्यांचे शरीरातील प्रमाण वाढल्यास ओमेगा ३ वापरणे शरीराला कठीण जाते. आणि ओमेगा ३ कमी पडल्यास कर्करोगाची शक्यता वाढते आणि एकंदरीत रोगप्रतिकारक शक्तीही खालावते.
मेदाम्ले बी१२ जीवनसत्त्व याबाबत जशी अर्ध सत्ये सांगितली जातात तशीच अ जीवनसत्त्वाबाबतही सांगितली जातात. अ जीवनसत्त्व हे शाकाहारातून भरपूर प्रमाणात मिळते असा सर्रास समज आहे. प्रचारकांकडून तो अधोरेखित केला जातो. वनस्पतींमध्ये असलेल्या बिटा कॅरोटीनचे रूपांतर करून शरीर अ जीवनसत्त्व मिळवू शकते हे सत्य आहे. पण ते रूपांतर करण्यासाठी साथीला चरबी किंवा तैलद्रव्ये खावी
लागतात. शिवाय हे रूपांतर काही तेवढेसे सोपे नाही. जे काही बिटा कॅरोटीन पोटात जाईल त्याच्या दोन टक्के अ जीवनसत्त्व शरीराला मिळते. शिवाय लहान मुले, वृद्ध माणसे थायरॉइड, गॉलब्लॅडरने ग्रस्त लोक यांना तितक्या चांगल्या प्रमाणात हे रूपांतर करता येत नाही. शरीराला सहज मिळेल असे अ जीवनसत्त्व मिळेल केवळ प्राणिज पदार्थातून मिळते. ताजे लोणी, इतर प्राणिज चरबीयुक्त पदार्थांच्या सेवनानंतरच बीटा कॅरोटीनपासून अ जीवनसत्त्व मिळवता येते. अ जीवनसत्त्व आहारात पुरेशा प्रमाणात असेल तरच आहारात आलेली प्रथिने किंवा मिनरल्सचा फायदा शरीराला उचलता येतो.
मांसाहारी लोकांमध्ये हृदयविकार, मूत्रपिंडाचे विकार, कर्करोग, स्थूलपणा, हाडांचा ठिसूळपणा अशा १७ रोगांचा प्रादुर्भाव अत्याधिक प्रमाणात असतो, असे छातीठोकपणे सांगितले जाते. गंमत अशी आहे, की यातील बऱ्याचशा रोगांचा प्रादुर्भाव विसाव्या शतकात अधिक होऊ लागला. त्या पूर्वीचा इतिहास, मानववंशाचा इतिहास साऱ्याकडे डोळेझाक करून असला प्रचार केला जातो. मांसाहार त्याज्य आहे हे सिद्ध करण्याच्या दृष्टीने अनेक अभ्यासप्रकल्प हाती घेतले गेले. शाकाहारी मताच्या शास्त्रज्ञांकडे त्यांची जबाबदारी असूनही, त्यातील अनेक निरीक्षणे अपेक्षेच्या उलट निघाली. डॉ. एच. ए. कान, डॉ. डी. ए. स्नोडेन यांच्या अभ्यासातून शाकाहारी लोकांना दीर्घायुष्य असल्याचा मुद्दा निकाली निघाला.
अखेर वैज्ञानिक सत्याशी प्रतारणा करू न शकलेल्या त्या शास्त्रज्ञांनी तसे मोकळेपणाने मान्यही केले आहे, पण तरीही शेवटी मांसाहार शक्य तितका न घेण्याचा सल्ला देऊन तर्कनिष्ठेशी मात्र त्यांनी प्रतारणा केली.
शाकाहार घेणे अर्थातच महत्त्वाचे आहे. आपण सारेच जण प्राय: शाकाहारच घेतो. कबरेदके मिळविण्यासाठी धान्याहार, पचनसंस्था स्वच्छ ठेवण्यासाठी तंतुमय भाज्या यांना पर्याय नाहीच; परंतु तेवढय़ाने पुरत नाही हेही मान्य करावे लागते.
प्राचीन मानव प्रामुख्याने शाकाहारी होता हा एक दावा फसवा आहे. आदिमानवाच्या आहारात फळेमुळे होती असे आग्रहाने सांगितले जाते. हे दावे मनघडन्त वाटावेत इतके अपुऱ्या माहितीवर आधारित आहेत. अजूनही शिल्लक असलेल्या ठिकठिकाणच्या आदिम जमातींचे निरीक्षण केले तरीही यातील तथ्यांशाचा अभाव जाणवतो.
काही ठिकाणी शिकारीचे मांस मिळेनासे झाल्यामुळे, पाळीव प्राण्यांचे मांस परवडेनासे झाल्यामुळे आणि एकूणच अन्न परवडेनासे झाल्यामुळे त्यांचा निरोगीपणा धोक्यात आला आहे.
आणखी एक गैरलागू मुद्दा पुढे केला जातो, तो म्हणजे मांसाहारामुळे आपल्या शरीरात हार्मोन्स, घातक कीटकनाशके, घातक रसायने जातात. प्राणी मारले जाताना त्यांच्यात जी स्ट्रेन्स हार्मोन्स जातात तीही
शरीराला चांगली नसतात असेही सांगितले जातात. यात निश्चितच तथ्य आहे, पण नेमके हेच शाकाहार, धान्याहाराच्या बाबतीतही होते. वाढत्या लोकसंख्येच्या गरजा भागविण्यासाठी अधिक अन्न उत्पादनासाठी जे आधुनिक मार्ग स्वीकारणे आपल्याला भाग पडले आहे त्याचीच ही परिणती आहे.
आहाराच्या पोषक मूल्यांसंबंधी सर्व मुद्दे मांडून झाले की शाकाहारवादी आजकालचे अव्वल नंबरचे चलनी नाणे वाजवू लागतात. ग्लोबल वॉर्मिग, क्लायमेट चेंजसाठी मांसाहार जबाबदार आहे असे सांगितले जाऊ लागले आहे. भावनिकतेच्या आहारी जाऊन पर्यावरणासाठी काम करू म्हणणारे किशोरवयीन कार्यकर्ते अनेकदा या बाबतीतील सत्याची पडताळणी करण्याच्या मन:स्थितीत नसतात. पण यासंबंधातील नेमका मुद्दा काय आहे तो पाहावाच लागेल. जगातील गरिबी, मिथेनचे उत्सर्जन अशा दोन मुद्दय़ांचा घोळ घालून जाऊन तयार झालेला हा मुद्दा आहे. खाण्यासाठी एक जनावर जगवायचे तर त्याच्यासाठी जे काही धान्य किंवा गवत तयार करावे लागते ते उगवण्याच्या जागेत जगभरातील अर्धपोटी, उपाशी पोटी जनतेसाठी धान्य उगवता येईल असा एक मुद्दा असतो. त्याच्या जोडीला गुरांच्या वाढत्या संख्येमुळे तयार होणारा मिथेन हा वायू पर्यावरणास हानीकारक आहे असेही सांगितले जाते. या वरवर छान छान आग्र्युमेंट वाटणाऱ्या मुद्दय़ांच्या अंतरंगात जरा डोकावून पाहा. गवतांमध्ये वैविध्य किंवा गुरांसाठी वाढवली जाणारी विशिष्ट धान्ये वाढू न देता केवळ काही धान्येच वाढू दिली तर जीववैविध्याची हानी होते याचा यात विचार आहे? गुरांमुळे मिथेन वाढतो म्हणून गुरे नष्ट करायची आहेत का? गुरांच्या वाढीसाठी पाण्याची नासाडी होते म्हणून गुरांची वाढ नको? गुरांचे अन्न, गुरांची विष्ठा, गुरांचे मूत्र याच्याशी संबंधित असलेल्या जीवाणूंचे अन्नसाखळीमध्ये,
पर्यावरणामध्ये महत्त्वाचे स्थान आहे.
सत्य एवढेच आहे, की प्रत्येकाने आपापल्या आवडीनिवडीप्रमाणे आणि सत्याधारित आरोग्यविचार लक्षात घेऊन आपापला आहार ठेवावा. अगदीच आवडत नसेल तर कुणी कुणावर अमूक एक गोष्ट खाण्याची सक्ती करू नये, पण आपापल्या आवडीनिवडीला तात्त्विक रंग चढवू नयेत. गेंडय़ाच्या पाठीसारख्या धारणा ठेवून इतरांवर अनैतिकतेचे हेत्वारोप करू नयेत.
अन्नविषयक आवडनिवड ही पूर्णत: व्यक्तिसापेक्ष आहे, हे शाकाहारवादी मंडळींनी लक्षात घ्यायला हवे.

स्वत:ची जी काही खाद्यसंस्कृती आहे किंवा तत्त्वे आहेत ती आपल्यापुरती जपावी. ती इतर लोकांवर काय आपल्या अजाण मुलांवरही लादण्याचा प्रयत्न करू नये. आपल्या पर्युषण पर्वात इतरांनी शाकाहार करावा (म्हणजे केवळ वनस्पती- जीवहत्या करावी!) म्हणून मासळीबाजार, कत्तलखाने बंद ठेवण्याचा आग्रह धरणे हाही दुराचारच.
आरोग्यरक्षणासाठी मितभुक्, हितभुक आणि अशाकभुक् राहावे असा आयुर्वेदाचाही उपदेश आहे.
मितभुक् म्हणजे- आहार कमी असावा, खादाडपणा करू नये. भुकेपेक्षा दोन घास कमी खावेत. खाण्याच्या दोन वेळांतही किती अंतर ठेवावे, तेही आयुर्वेदाने सांगितले आहे. दोन तासांच्या आत पुन्हा खाऊ नये आणि सहा
तासांपेक्षा जास्त काळ न खाता राहू नये.
हित भुक् म्हणजे- आवडणारे अन्नघटक खावेत, कारण जे आवडतात ते घटक सहसा तुमच्या पचनसंस्थेला सहन होणारे असतात. ज्या घटकांमुळे किळस किंवा घृणा वाटेल, नकोसे वाटेल ते घटक जबरदस्तीने खाऊ नयेत.
आणि अशाकभुक् म्हणजे- आहारात अशाक म्हणजे प्राणिज आणि प्राणिजन्य पदार्थही पुरेसे असावेत.
खरे म्हणजे शुद्ध शाकाहार हे काहीतरी नैतिक आचरण आहे असे म्हणणे, शाकाहार म्हणजे पोषणदृष्टय़ा श्रेष्ठ आहार असे कुठल्याही शास्त्रीय आधाराशिवाय सांगणे हा सत्यापलाप आहे आणि सत्यापलाप हा सर्वात मोठा दुराचार आहे. 


--- लोकसत्ता 






No comments:

Post a Comment