Tuesday 6 March 2012

शेतीची जन्मकथा







माणसाच्या प्रगतीची सुरुवात शेतीच्या शोधापासून झाली. म्हणून शेतीचा आरंभ ही मानवी इतिहासातील पहिली क्रांती होय. पण शेतीचा शोध म्हणजे काय व तो क्रांतिकारक का ठरतो, हे जाणण्यासाठी थोडे प्राणिशास्त्रीय व भूवैज्ञानिक भूतकाळात शिरावे लागेल. दीड कोटी वर्षांपूर्वीच्या काळात सर्व प्रायमेटवंशीय प्राणी निबीड जंगलात राहत होते. (मर्कट, पुच्छहीन वानर व मान व यांच्या सामायिक गटाला प्रायमेट म्हटले जाते.) तेथे अन्नाचा तुटवडा नव्हता. फळे, कंदमुळे, कीटक यांजवर चांगली गुजराण होत होती. पण आता जागतिक पर्यावरणात मोठा बदल झाला. जंगलांचे जमिनीवरील आवरण बरेच कमी झाले. अन्नाचा तुटवडा    भासू लागला. तेव्हा काही प्रायमेटवंशीयांना मैदानी भागात उतरणे भाग पडले. अर्थात हे कमजोरांच्या नशिबी आले. बलदंड जागचे हल्ले नाहीत. स्थलांतरितांना अन्नाचा तुटवडा भासू लागला. त्यामुळे ते शिकारीकडे वळले, मांसाहारी बनले. दोन पायावर ताठ उभे राहणे, धावणे, औजारे बनविणे वगैरे शिकलेला हा प्रायमेट (homoerectus) मानव मानला जातो. ही अवस्था साधारण सहा लाख वर्षांपूर्वी आली. त्यासाठी १ कोटी वर्षे लागली.
यानंतर अंदाजे दहा हजार वर्षांपूर्वी जागतिक पर्यावरणात आणखी एक मोठा बदल घडला. अखेरच्या हिमयुगाचा अंत झाल्यामुळे समशीतोष्ण कटिबंधातले हवामान उबदार बनले. तेथील निमवाळवंटी प्रदेशात मरुउद्याने (ओअ‍ॅसिस) तयार झाली व तो भाग उंचउंच गवताने व्यापला. बर्फाचे साठे वितळून समुद्राची पातळी वाढली. त्यामुळे उष्ण कटिबंधात भरपूर पाऊस पडू लागला व जंगले फोफावली. या परिस्थितीत समशीतोष्ण कटिबंधातील मानवापुढे नवी आव्हाने घेऊन ठेपली. केवळ शिकारीवर गुजराण होणे अशक्य झाले. कारण उरलेल्या जंगलाची प्रतही खालावली. पण याच काळात इस्रायलपासून इराणपर्यंत पसरलेल्या शुष्क पण सुपीक पट्टय़ात रानटी सातू (बार्ली) व गहू गवताप्रमाणे उगवू लागले. माणसाने त्याचा खाण्यासाठी उपयोग
सुरू केला. अशात निसर्गाने एक किमया केली. रानटी गहू व गवत यांच्यात संकर होऊन एमर (Emmer) नावाच्या गवताची जात जन्मास आली. तिचा पुन्हा गवताशी संकर होऊन ज्याला ब्रेड व्हीट म्हणतात त्या गव्हाच्या जातीचा जन्म झाला. या नव्या पिकाची वाढ मात्र लागवडीशिवाय होणारी नव्हती. माणूस व गहू यांना निसर्गाने जणू एकमेकांसाठी निर्माण केले होते. आद्य शेतकऱ्याने ते ओळखले व त्याची लागवड सुरू केली. ब्रेड व्हीटला जन्म देणारा संकर ठिकठिकाणी स्वतंत्रपणे झाला. जेरिको (इस्रायल) जार्मी (इराक), अलिकोश (इराण) येथे त्याचे पुरावे सापडले आहेत. बायबलच्या जुन्या करारात जेरिकोच्या लोकांचे वर्णन येते. भटकंती सोडून स्थायिक होणाऱ्या आद्य शेतकऱ्यांच्या जीवनावर ते प्रकाश टाकणारे आहे. शेतीच्या शोधाला निसर्गातील अपघात कारणीभूत झाला हा मुद्दा येथे महत्त्वाचा.
थोडक्यात शेतीचा आरंभ १०,००० वर्षांपूर्वी पश्चिम आशियात झाला. आपल्या उपखंडात मात्र ५००० वर्षांपूर्वी शेती सुरू झाली. ती इतकी उशिरा होण्याचे कारण येथे शेतीची गरजच भासली नाही. अन्नपुरवठा करणारी जंगले विपुल होती. आळशीपणा हा माणसाचा एक उपजत गुण आहे. सर्वकाही सहज उपलब्ध होत असेल तर तो कष्टाच्या वेगळ्या कामाकडे वळत नाही. परिस्थिती पाश्र्वभागावर लत्ताप्रहार करते तेव्हा एकतर तिच्यावर मात करून तो पुढे येतो अथवा नामशेष होतो. शेती हा माणसाला आकर्षून घेईल असा उद्योग नव्हता. शेतीचा जन्म माणसाच्या मजबुरीतून झाला. पण त्यातून पुढच्या प्रगतीची वाट मोकळी झाली.
आता शेतीच्या शोधाला पहिली क्रांती का म्हणायचे हा प्रश्न. माणसाचा सहा लाख वर्षांचा इतिहास म्हणजे १२ तासांचे अर्थात ६० मिनिटांचे घडय़ाळ आहे अशी कल्पना केल्यास काय दिसते? माणूस पहिली ५१ मिनिटे
अन्न संग्राहक अवस्थेत भटकत होता व शेतीपासून संगणक युगापर्यंतची त्याची प्रगती शेवटच्या १ मिनिटातली आहे. वाढत्या झपाटय़ाने होत जाणारी प्रगती शेतीनेच सुरू केली व शेतीशिवाय ती झालीच नसती म्हणून शेतीचा शोध आद्य क्रांती ठरते.
पश्चिम आशियातील सातू व गहू या पिकांचा इराण व बलुचिस्तान मार्गे भारतात प्रवेश झाला. मेहेरगढ (बलुचिस्तान) हे हरप्पा संस्कृतीचे एक ठिकाण. तेथे ८००० वर्षांपूर्वीच्या गव्हाचे अवशेष मिळाले आहेत. निम वाळवंटी प्रदेशातील सिंधू संस्कृतीचा पाया या दोन धान्यांनीच घातला. ही शेती कमी कष्टाची असल्यामुळे शेतकऱ्याला स्वास्थ्य मिळवून देते. या धान्याच्या अतिरिक्त उत्पादनामुळे पहिली नगरे उदयास आली. सिंध, पंजाब, हरयाणा व राजस्थान येथे शेतीची साक्ष देणारी किमान १३८ स्थळे (sites) सापडली आहेत. ती खासकरून सरस्वती नदीच्या काठी आहेत. सरसू व हरभरा ही पिकेसुद्धा घेतली जात. कालिबंगन (राजस्थान) येथे एकाच शेतात ही दोन्ही पिके एकाच वेळी काढल्याचा पुरावा ५००० वर्षांपूर्वीचा आहे. ही प्रथा किती जुनी आहे हे त्यावरून कळते. आर्याचे मुख्य अन्न सातू हेच होते. गव्हाचा उल्लेख त्यांनी म्लेंच्छ भोजन असा केलेला आढळतो. उत्तर भारतात सातूचे महत्त्व इसवीसनाच्या सातव्या शतकापर्यंत टिकून होते. नंतर त्याची जागा गव्हाने घेतली.
जोंधळा, बाजरी, नाचणी किंवा रागी, तूर, मूग ही धान्ये मूळची आफ्रिकेतील. प्रागैतिहासिक काळात समुद्रमार्गे त्यांचे भारतात पहिले आगमन झाले. नंतर पश्चिम आशियातून. नाचणी मूळची युगांडाची. हल्लूर (कर्नाटक) येथे ३८०० वर्षांपूर्वीची नाचणी आढळून आली आहे. किमान १००० वर्षे (४०००- ३००० व पू.) नाचणी हेच
दाक्षिणात्यांचे प्रमुख अन्न होते. तांदूळ त्यांना माहीतच नव्हता हे आज धक्कादायक वाटेल. तामिळनाडू व कर्नाटकात बाजरी व कुळीथ ही पिकेसुद्धा काढली जात. महाराष्ट्रात बाजरी सर्वात आधी पोहोचली, ज्वारी नंतरची.
तांदूळ हे भारताचे खास धान्य. जगात तांदूळाच्या आठशे जाती आहेत. पैकी निम्म्या भारतात पिकविल्या जातात. भातशेती कष्टाची असली तरी तुलनेत जास्त लोकसंख्या पोसू शकते. शिवाय भात (paddy) वर्षभर साठविता येते. साधारण ४००० वर्षांपूर्वी भारतात ही शेती रूढ झाली. तांदूळाचा सर्वात जुना पुरावा ७००० वर्षांपूर्वीचा थाईलॅण्डमधील आहे. त्यामुळे आग्नेय आशियातून तांदूळ येथे आला असे मानले जाई. पण सिंधभूम व ओरियम (बिहार) आणि कोल्डिवा) उत्तर प्रदेश येथे जंगली व विकसित तांदूळाचे अवशेष सापडले आहेत. ते ५००० वर्षांपूर्वीचे असावेत. विंध्य पर्वतातील बेलन नदीचे खोरे हे मैदानी प्रदेशातील भातशेतीचे उगमस्थान होय. तेथून आरंभ झालेल्या भातशेतीने उत्तर प्रदेश, बिहार, बंगाल व ओरिसा क्रमाक्रमाने व्यापले. नैसर्गिक संकटातून जन्मास आलेली O.Sativa नावाची नवी जात अस्सल भारतीय मानली जाते. तीन हजार वर्षांपूर्वीपासून संस्कृत वाङ्मयात
तांदूळाच्या जातींचे उल्लेख मिळत जातात. त्याच सुमारास तांदूळाने दक्षिण भारतात प्रवेश केला व हळूहळू नाचणीस हटविले. इसवी सनाच्या दुसऱ्या-तिसऱ्या शतकात कालव्याच्या पाण्याची सोय झाल्यावर भातशेतीस बहर आला अन् तांदूळावर आधारलेली खास दाक्षिणात्य इडली-डोसा संस्कृती उभी राहिली.सिंधूच्या क्षेत्रात नागरीकरण वाढल्यामुळे तेथील काही विस्थापित शेतकरी माळव्यात आले. त्यांनी गहू व जव यांची लागवड सुरू केली. पण चार हजार वर्षांपूर्वी माळव्यात मोठा भूकंप झाला. तेथील शेती १०० वर्षे बंद पडली. त्यानंतर शेतीने पुन्हा जोर धरला. शेती संस्कृतीवर आधारलेली खेडी उदयास आली. महेश्वर व नावडाटोली ही या काळातील सर्वात मोठी सुनियोजित ग्रामे होती. त्यांचा पश्चिम आशियाशी संपर्क होता. पण इसवी सन पूर्व दुसऱ्या सहस्रकात (२००० ते १०००) जागतिक पर्यावरण बिघडू लागले. माळव्यात पाऊस कमी कमी होत गेला व ही शेती बंद पडली.
महाराष्ट्रात शेतीचा आरंभ चार हजार वर्षांपूर्वी खानदेशच्या काळ्या मातीत झाला. सिंधू संस्कृतीचा ऱ्हास सुरू झाल्याने गुजराथमधील शेतकरी तापी नदीच्या खोऱ्यात दाखल झाला. नंतर माळव्यातील अनुभवी शेतकरी तेथे आला. गोदावरी व भीमा नद्यांच्या काठची काळी माती त्यांनी प्रथम लागवडीस आणली. गव्हाची लागवडही सुरू केली. ३४०० ते ३००० वर्षांपूर्वीच्या काळात येथे शेतीची खूप भरभराट झाली. महाराष्ट्राची काळी चिकणमाती (black cotton soil) लोखंडी नांगराशिवाय नांगरली जाणे अशक्य होते. पण उन्हात तापल्यामुळे जमिनीत भेगा पडतात. त्यात बी पेरून लहान प्रमाणावरची शेती करता येते. हे या आद्य शेतकऱ्याने सिद्ध
केले. या काळात प्रकाश (जि. धुळे), दायमाबाद (जि. अहमदनगर), इनामगाव (जि. पुणे) नेवासे (जि. अहमदनगर) अशी गावे उदयास आली. दायमाबाद हे जणू प्रागैतिहासिक महाराष्ट्राची राजधानीच होते. मात्र येथील कोणत्याही गावाचा नगरात विकास झाला नाही.
महाराष्ट्राची भूमी सर्वप्रथम लागवडीखाली आणणाऱ्या आद्य शेतकऱ्याच्या नशिबी मात्र अखेर काय आले? वर उल्लेखलेल्या पर्यावरणातील बदलामुळे पाऊस कमी कमी होत गेला. तीन हजार वर्षांपूर्वीपासून येथे दुष्काळी 
परिस्थिती निर्माण झाली. शेते उजाड पडू लागली. महाराष्ट्राचा आद्य शेतकरी देशोधडीला लागला. बकऱ्या, मेंढय़ा, गुरे-ढोरे घेऊन भटकंती करू लागला. पुढे जवळजवळ चारपाचशे वर्षे महाराष्ट्रात शेतीच बंद पडली. तिची नव्याने सुरुवात झाली ती लोहयुग स्थिरावल्यानंतर, स्मृतिपुराणांच्या काळात. यज्ञसंस्कृतीने शेतीची उपेक्षा केली होती, पण आता ब्राह्मणवर्गसुद्धा शेतीकडे वळला. दक्षिणेत शेतीचे तंत्रज्ञान पसरविण्यात त्याने हातभार लावला. महाराष्ट्रात शेतीचे पुनरुज्जीवन झाले. शेतीवर आधारित एक आर्थिक-सामाजिक-धार्मिक-राजकीय व्यवस्था उभी राहिली.अशी ही शेतीची जन्मकथा काय सांगते? पर्यावरणाच्या एका तडाख्यामुळे ज्याला जमीन कसणे भाग पडले, तरी मानवाच्या अवघ्या प्रगतीचा शुभारंभ ज्याने केला, त्यालाच पर्यावरणाच्या दुसऱ्या धक्क्याने देशोधडीला लावले. निसर्गाच्या निष्ठुरपणाचे आघात सर्वात जास्त त्यानेच झेलले. प्रतिकूल परिस्थितीत स्वत:चे व शेतीचे रक्षण स्वत:च करणारा शेतकरी सुरुवातीपासूनच समाजाचा दुर्बल घटक राहिलेला आहे. शेतीच्या पुनरुज्जीवनानंतरसुद्धा तो जमीनदार, सावकार, सरकार व दलाल यांच्या कचाटय़ातून सुटलेला नाही. शेतीच्या जन्मकथेतच माणसाच्या प्रगतीची गाथा व शेतकऱ्याची व्यथा बेमालूमपणे गोवल्या गेल्या आहेत. देवो दुर्बलघातक:!

शेतीचा शोध स्त्रियांनी लावला?
प्राथमिक अवस्थेतील टोळीबद्ध समाज मातृसत्ताक होते. कारण प्रजोत्पादन पुरुष संपर्काशिवाय होत नाही हे त्यांना माहीत नव्हते, असे मत मानवशास्त्रज्ञात एकेकाळी प्रचलित होते. देवीप्रसाद चट्टोपाध्याय यांनी ते गृहीत धरले, शिवाय आपल्या ‘लोकायत’ (१९५९) या ग्रंथात एक पाऊल पुढे जाऊन आद्य मानव संस्कृतीत
शेती हा स्त्रियांचा शोध व स्त्रियांचाच उद्योग होता असा सिद्धांत मांडला. ज्या काळात नांगर नव्हता, शेतीसाठी पशूंचा वापर नव्हता, तेव्हा शेतासाठी जमीन तयार करणे, पेरणी, मळणी, राखण करणे ही कामे स्त्रियांची होती असे सांगून टाकले. काही काळ हे मत प्रस्थापित झाल्यामुळे शिकविले गेले, पण नंतर उपलब्ध होत गेलेल्या पुराव्यांमुळे ते टिकले नाही. मातृप्रधान ते पितृप्रधान ही प्रगतीची पायरी नाही. काही समाज मातृप्रधान होते व ते आजही आहेत. शेतीचा शोधसुद्धा ठिकठिकाणी स्वतंत्रपणे लागला. तो स्त्रियांकडून का पुरुषांकरवी हा प्रश्न निर्थक होय.

आद्य शेतकऱ्याचे अन्य योगदान
आद्य शेतकऱ्याने केवळ धान्य पिकविले नाही तर आणखी बरेच काही साधले. स्थायी जीवनाची सुरुवात त्याने 
केली. ग्राम संस्था व कुटुंब संस्था यांचा पाया घातला. भावना मातीत रुजविल्या. पशू, पक्षी, नाले, नद्या, पर्वत यांजवर प्रेम केले. तृणमूल धार्मिक संकल्पना त्यानेच निर्माण केल्या. पृथ्वीला आदिमाता मानले. यातूनच स्त्री देवतांचा उगम झाला. सीता हीसुद्धा मूळची एक कृषिदेवता. यज्ञासाठी भूमी नांगरताना ती सापडली हे मिथकाच्या भाषेतील तिचे वर्णन. तिला पिता नाही, कारण पृथ्वी पर्जन्यवृष्टीनंतर प्रसवते व नवसृष्टीला स्वत:च जन्म देते. शेतीसाठी पशुपालन लागते म्हणून प्राण्यांची सर्रास हत्या करून चालणार नाही हे शहाणपण त्याला सुचले. शेती हे पर्यावरणावरील अतिक्रमणच असते. त्यासाठी जंगल जाळले तरी मुळे उखडणे, गवत कापणे, लाकूड तोडणे-तासणे हे काम सोपे नव्हते. त्यासाठी विविध प्रकारची दगडी औजारे त्याने विकसित केली. त्यासाठी योग्य असे दगड शोधून काढले. पाण्यासाठी कालवे खोदले. कुंभाराचा धंदा त्यानेच उभा केला. चाक या मूलभूत यंत्राचा शोध लावला. मातीचे भांडे पक्के होण्यासाठी ६०० डिग्री सेल्सियस इतके उष्णतामान लागले. त्याहून कमी असल्यास भांडे कच्चे राहते, जास्त झाल्यास त्याचा कोळसा बनतो. असे सर्व अनुभवजन्य ज्ञान एक वैज्ञानिक व तांत्रिक झेप होती. शेतकऱ्याचे योगदान म्हणजे शेतीच्या उत्पादनामुळे उभ्या राहिलेल्या संस्कृतीचे योगदान.

 

 
----- डॉ. यशवंत रायकर




 

No comments:

Post a Comment