Thursday 22 March 2012

पानिपतची लढाई -- १








पानिपतची लढाई  भाग १ 

औरंगजेब हा मुस्लिम समाजात चांगलाच लोकप्रिय होता ,त्याच्या धार्मीकपणाच्या नाटकाने सर्वसामान्य मुस्लिम समाज त्याला ” आलमगीर, जिंदा पीर” म्हणजे जिंवत पीरबाबा म्हणत. तथापि मराठ्यांनी २७ वर्षे चाललेल्या युद्धात त्याचा आणि प्रबळ मोगली सत्तेचा पराभव केला. औरंगजेब जिवंत असतानांच मराठी फ़ौजा नर्मदापार झाल्या.
छत्रपती शाहू राज्यावर आल्यावर मराठी फ़ौजा वेगवेगळ्या सरदारांच्या आणि पेशव्यांच्या नेतृत्वाखाली भारतभर पसरल्या. मराठ्यांकडून स्फूर्ती घेउन राजपुत, जाट, शीख आणि इतर राजेरजवाड्यांनी मुगल छत्र झुगारुन दिले. बंगालचा नवाब, हैदराबादचा निझाम, अवधचा नवाब अशा मुस्लिम राजांनीही तेच केले. यात परत इंग्रज इ. परकिय सुध्दा होते. या काळात मुस्लिम राजे आणि नवाबसुध्दा बाजुच्या हिंदु राजा अथवा मराठ्यांच्या भितीने धर्मसहिष्णुपणा दाखवायला लागले.
१७३९ साली नादिरशहा येउन दिल्ली लुटुन गेला. मध्यवर्ती सत्ता कमकुवत झाल्याने पुर्ण भारतभर अराजक माजले होते. ही वास्तवीक मराठ्यासाठी अतीव सुंदर संधी होती.पण पहिला बाजीराव सोडला तर बाकी सर्व पेशव्यामध्ये दुरदृष्टीचा अभाव अभाव असल्याने त्यांनी दिल्लीचा बादशहाला संपवुन हिंदु साम्राज्य उभे करण्याऎवजी चौथाई/सरदेशमुखी गोळा करण्यात आणि लुटालुट करण्यात समाधान मानले. मराठ्यांच्या लुटालुट आणि इतर गैरवर्तनाने मराठ्यांच्याबद्दल उत्तर भारतात अप्रिती होती.
उत्तर भारतातले मुस्लीम राजेरजवाडे,मुल्ला-मौलवी आणि सर्वसामान्य मुस्लीमाला हे जाणवत होते की मुस्लीम राजवट संपली, मुस्लिमांना फ़ौजेत, नोकर्‍यात जे प्राधान्य होते ते गेले. याचे कारण शोधताना मुस्लिम धर्मापासून ढळल्याने हे झाले आणि मोगलांचा हिंदु सरदार फ़ौज पदरी ठेवण्याने झाले हा शोध मुल्ला-मौलवींनी लावला. ह्या विचाराचा प्रमुख होता शहा वलीलुल्ला [इ.स. १७०३ ते १७६२. हा सर्वसाधारणपणे जमाते इस्लामी /सौदी अरबियातले वहाबी तत्वज्ञान/देवबंद मधले दार-उल-उलुम यांच्या मुलतत्ववादी विचारांचा होता. ही सर्व ह्याच शहा वलिलुल्ला आणि अब्दुल वहाब यांच्या विचारांची २०/२१ व्या शतकातली अपत्ये आहेत. याने उत्तरेच्या सर्व मुसलमानांना काफ़िरांचा आणि त्यांच्या राज्याचा [यात मराठे/शीख/राजपुत/जाट सगळे आले] नाश करा इ. शिकवायला सुरुवात केली.
या शहा वलीलुल्लाने मुसलमांनामध्ये जागृती आणली.मग त्याने आणि नजीबने अहमदशाहा अबदालीला भारतात येउन मुस्लिम मुलतत्ववादी राज्य दिल्लीला स्थापन करण्याचे आवाहन केले. शहा वलीलुल्लाचे हे पत्र मुळातुन वाचण्यासारखे आहे. या आधी त्या अबदालीने १७४८, १७५०, १७५१, १७५६ साली भारतावर आक्रमण केले होते.
अहमदशहा अबदालीच्या मुलाला मराठ्यांनी लाहोर काबीज करतांना हाकलले होते ते निमीत्य करुन त्याने भारतावर स्वारी १७५९ मध्ये केली.नानासाहेबांना दिल्लीच्या बादशहाने विनंती केली म्हणून त्यांनी सदाशिवराव भाऊ आणि विश्वासरावांच्या नेतृत्वाखाली ३०००० खाशा आणि २०००० शिंदे/होळकरांची फौज घेउन रवाना केले. अबदाली ३०००० फ़ौज घेउन आला होता त्याला नजीबखान रोहिला, मोहमद बंगाश इ. भारतीय मुसलमान जिहादसाठी ३०००० फ़ौज घेउन मिळाले.
उत्तर भारतात मराठी फ़ौजांच्या लुटालुट आणि इतर गैरवर्तनामुळे सर्व हिंदु राजे-रजवाडे आणि हिंदु प्रजा तटस्थ राहीली.मराठी फौजांपैकी होळकर न लढता पळाले कारण त्यांना उत्तर हिंदुस्तानात पेशव्यांचे वर्चस्व नको होते.
मराठे जेंव्हा पानिपतात हरले तेंव्हा वाचलेले मराठी सैनिक जीव वाचवून छोट्या छोट्या समुहात महाराष्ट्राकडे पळत असतांना त्याना वाटेतल्या खेड्यापाड्यात सूड म्हणून लूटले गेले आणि मारले गेले.
अर्थात पानिपतचे युध्द मराठे लढले म्हणून आजचा भारत अस्तित्वात आला. कारण या युध्दात अहमदशहा अबदालीचे इतके जबरदस्त नुकसान आणि प्राणहानी झाली की तो हाय खाउन परत गेला. पानिपतची लढाईसुध्दा अहमदशहा अब्दालीने अक्षरशः जेमतेम केसाच्या फरकाने जिंकली. अफ़गाणी सैन्याचीही फार कत्तल झाली.
तो परत गेला आणि त्याने पुन्हा भारताकडे बघीतले नाही. पानीपतची लढाई जिंकल्यावर त्याला नानासाहेब पेशवे मोठी फौज घेउन येत आहे ही बातमी कळल्यानतंर तो घाईघाईने परत गेला आणि जातांना दिल्लीच्या मोगल बादशहाला सगळ्यांनी मानावे असा प्रेमळ[???] निरोप देउन गेला.
तो गेल्यावर शीख जे पानीपतच्या युध्दात तट्स्थ होते त्यांनी उठाव करुन लाहोरमधला अब्दालीच्या सुभेदाराची कत्तल केली.त्यांमुळे अहमदशहा अब्दाली १७६४ आणि १७६७ मध्ये भारतात आला पण आधीच्या प्रचंड लढाईतल्या हानीमुळे तो लाहोरच्या पुढे आला नाही. त्याने पुन्हा मध्य भारताकडे बघीतले नाही.
जर मराठे पानिपताला लढले नसते तर अहमद्शहा अबदालीने दूसर्‍यांदा दिल्ली जिंकली असती.[ पहिल्यांदा १७५७ मध्ये] आणि या वेळेला त्याचा सल्लागार आणि धर्मगुरु शहा वलीलुल्ला होता. शहा वलीलुल्ला हा अतिशय प्रभावी मुल्ला होता .त्यामुळे उत्तर भारतात तालिबान सारखे अतीशय कडवट मुस्लिम राज्य आले असते आणि मग भारतभर पसरले असते.कोणास ठाउक याचा पुढे इतिहासावर काय परिणाम झाला असता.
नजीबउद्दौलाचा सुड महादजी शिंद्यांनी घेतला. पानीपतावर झालेल्या पराभवात महादजी शिंदेही जखमी अवस्थेत पळाले होते.त्यानतंर जेंव्हा त्यांनी उत्तर भारत ताब्यात आणला आणि दिल्लीवर आपला कब्जा बसवला.
१७७२ साली त्यांनी नजीबाबादवर हल्ला चढविला तेंव्हा नजीब उदौल्ला १७७० मध्ये मृत्यु पावला होता .त्या मुलगा झपिटाखान नजीबाबाद सोडून पळाला. महादजी शिंद्यानी नजीबच्या कुटुंबातल्या बायका,मुले,आबालवृध्द सगळ्यांची कत्तल केली आणि नजीबची कबर खणून त्याची हाडॆ आगीत भस्म केली.आणि त्याचा राजवाडा समूळ पाडला.
अर्थात एक महत्वाची गोष्ट आपण सगळ्यानींच लक्षात ठेवायला हवी की जरी मराठे आणि पेशव्यांनी चुका केल्या असतील तरीही जर मराठे पानीपताला लढले नसते तर आज भारतातुन कदाचीत हिंदुचे नामोनिशाण मिट्ले असते. तसेच मराठ्यांनी आपल्या घोड्यांच्या टापाखाली जेवढा भारत तुडविला साधारण पणे तेवढाच भारत आज फाळणीनतंर आपल्या देशाच्या हातात आहे, तोच आजचा भारत आहे.
पानिपतच्या युध्दातल्या प्राणहानीचे वेगवेगळे आकडे आहेत. तरीही मराठ्यांची साधारण ३५०००ते ४५००० फौज रणात कापली गेली आणि ४०००० जण युध्द संपल्यावर दोन दिवस ज्या निर्घृण कत्तली चालल्या होत्या त्यात मारले गेले. यात फौज, बाजारबुणगे आणि बरोबर असलेले यात्रेकरू यांचा समावेश आहे. पानिपतवरून जीव वाचवून पळणाऱ्या मराठ्याना वाटेतल्या लोकांनी लुटले आणि १००००/२०००० यात मारले गेले.
अब्दालीच्या सैन्यात साधारणपणे २००००ते ३०००० मेले आणि त्याला या जिहादसाठी मदत करणारे भारतीय रोहिले ३०००० ते ३५००० मारले गेले. फक्त १६ वर्षाचे जनकोजी शिंदे पकडले गेले आणि त्यांचे मुंडके उडविले. सगळ्यात जास्त हाल हाल करून इब्राहिमखान गार्दीला मारले कारण मुस्लीम असून तो मराठ्यांच्या बाजूने लढला आणि त्याने आपल्या तोफखाना आणि बंदूक पलटणीने युध्द जवळजवळ जिंकून दिले होते.
मराठी साम्राज्य केंव्हातरी पेशव्यांच्या धोरणविषयक दिवाळखोरीने बुडणारच होते पण पानिपतच्या युध्दानंतर मराठी सत्तेचे केंद्र संपले आणि पेशव्यांचा उत्तर भारत आणि त्यांच्या स्वतःच्या सरदारावरचे नियंत्रण गेले आणि ते सरदार स्वतंत्र झाले. यानंतर मराठा शक्ती फक्त ५०/६० वर्षे टिकली आणि तीही या सगळ्या वेगवेगळ्या राज्यांचे कडबोळे म्हणून. म्हणून याला इंग्रजीत ” The Maratha confederacy ” असे म्हणतात. या बाबतीत “स्वामी” आणि ना.स. इनामदारांच्या कांदबऱ्याना इतिहास समजू नका,ते स्वप्नरंजन आहे.
औरंगजेबाविरुध्द २७ वर्षे लढताना मराठी सैन्य हे इतक्या बिकट परिस्थितून गेले की मुघल मुलखात लुटालू करण्यावाचून दुसरे काही उत्पन्नाचे साधन नव्हते कारण शेतसारा, जकात इ. उत्पन्न २७ वर्षे मुघल फौज मराठी मुलखात पसरल्याने होताच नव्हते. पण औरंगजेबाच्या हयातीतच मराठे जिंकले आणि नर्मदापार झाले होते. मग उत्पन्नाचे साधन म्हणून मराठ्यांनी वार्षिक खंडणी चौथाई म्हणजे वर्षाच्या कराचे २५ % हे बादशहाच्या सरदाराकडून वसूल करायला सुरवात केली. तसेच सरदेशमुखी म्हणजे साधारण २ ते ५ %कराच्या उत्पन्नाचे घेण्यास सुरुवात केली पण बहुतेक वेळा ही रक्कम लुटालूट करून वसूल केली जात असे. विजयादशमीला फौज मुलुख्गीरीला बाहेर पडत असे ती लुटालूट करून परत येत असे.
पेशव्याना आपल्या स्वतःच्या ताकदीचा कधी अंदाज आला नाही की आता मोगल बादशाह हा संपला आणि मराठे पूर्ण भारतभर आपले राज्य वसवू शकत होते.स्वतः अथवा छत्रपतीना दिल्लीच्या तख्तावर बसवू शकत होते ,त्यासाठी सगळ्या राजे राजवाड्याना आणि जनतेला आपलेसे करून घेणे आवश्यक होते पण पेशव्यांकडे तेवढी दूरदृष्टी नव्हती, ते कधी लुटालुटीतून बाहेरच आले नाही
उत्तर भारतात सम्राट अकबराने मुघल राज्य हे हिंदूमुस्लीम सहकार्यावर आधारित असे वसविले आणि जमिनसारा,जकात इ. चे नियम राजा तोरडमल याने आखून दिले. यानंतर उत्तर भारत हा एका स्थिर राजवटीखाली होता. औरंगजेब मरेपर्यंत उत्तर भारतात तशी शांतता नांदत होती. त्यामुळे मराठ्यांची टोळधाड हे उत्तर भारतासाठी एक नवीन आपत्ती होती.
मराठे लुटालूट करत म्हणजे फक्त श्रीमंत सावकार ,राजे राजवाडेच नव्हे तर सामान्य जनताही त्यांच्या जाचातून सुटत नसे.जात,धर्म इ. ते बघत नसत. या बाबतीत आपण समकालीन उत्तर भारतीय साधने वाचावीत कारण या सगळ्याला एक अप्रिय किनार होती जी या मंचावर तरी लिहिता येत नाही ….
मराठे कमी पडले ते युद्धशास्त्र अथवा राजकारणात नाही पण दूरदृष्टीमध्ये.जी दृष्टी घेऊन शिवछत्रपतींनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले ती दृष्टी संभाजी महाराज पकडले गेल्यावर नष्ट झाली. शाहू छत्रपती तर १७/१८ वर्षे मुघल छावणीत राहून आले त्यामुळे त्यांना ती दृष्टी नव्हती,पण पेशव्याना तरी असायला हवी होती.
आपण राज्य करतो म्हणजे काय आणि ते आपल्याला कुठे घेऊन जायचे आहे,हे राज्य रयतेसाठी आहे ही भावना आणि एक अतिशय दूरच्या भविष्याचा विचार करून धीमेपणाने,धूर्तपणाने पावले उचलणे हे सगळे त्या दूरदृष्टीमधून येते .[याला इंग्रजी शब्द Vision असा आहे.].
युद्धशास्त्र अथवा राजकारण ही त्या अंतिम ध्येयासाठी वापरण्याची हत्यारे आहेत .मराठ्यांनी मुघलापासून ते इंग्रजाविरुध्द लढाया जिंकल्या पण कुठे स्थिर असा विजय मिळविला नाही कारण “आजचा दिवस” एवढीच राजकीय बुद्धी म्हणा दृष्टी म्हणा त्यांच्याकडे होती.जर शिवछत्रपतीच्या तोडीचा एकही नेता पेशव्याकडे त्यांच्या हातात जे सामर्थ्य आणि समोर जे राजकारण होते ते हाताळायला असता तर हिंदुपद्पादशाही या भारतावर राज्य करत असती.
बंगालची दिवाणी ब्रिटीशाना १७५६ मध्ये मिळाली पानिपतच्या ५ वर्षे आधी पण या घटनेचा काहीही संपर्क अथवा समज ऐन भरात असलेल्या नानासाहेबाना झालेला दिसत नाही.
हिंदूंमध्ये एक महत्वाचा अवगुण आहे की आपण विजय वाया घालवितो .पुथ्वीराज चौहानने मोहमद घोरीविरूढ मिळविलेला विजय वाया घालविला. विजयनगर साम्राज्याने बहामनी विरुध्द आणि नंतरच्या आदिलशाही इ. सुलतानाविरुध्द अनेक विजय मिळविले पण त्यांचा बिमोड केला नाही शेवटी स्वतः नाश पावले.हेमूने दिल्ली जिंकली पण त्या विजयाचा फायदा घेता आला नाही आपनी पानिपतावर हरला.
मराठ्यांनी औरंगजेबाला हरविले. पण शाहू छत्रपतींनी ने दिलेले वचन आणि चौथाई इ.च्या नादी लागून दिल्लीचा बादशाह नष्ट केला नाही. जर बादशाह आणि इतर नवाब नसते तर मराठे दिल्लीचे मालक असते आणि इतक्या दूर फौजा घेऊन जाव्या लागल्या नसत्या. तसेच नजीब आणि रोहील्यासारखे जिहादी अब्दालीला भारतातून मिळाले नसते. शिवाजी महाराजांनी घालून दिलेले लढाईचे नियम पेशवे विसरले आणि पानिपत घडले.
या बाबतीत सिमल्याला १९७२ साली आलेल्या पाकिस्तानी शिष्ट मंडळातील एका जनरलने आपला अनुभव लिहिला आहे तो वाचण्यासारखा आहे.तो म्हणतो की “भारताने १९७१ चे युध्द पूर्णतहा जिंकले होते. आमच्या देशाचा अर्धा भाग फुटून निघाला होता, ९३००० पाकिस्तानी युद्धकैदी भारताकडे होते. आमच्या पूर्ण देशाचा आत्मविश्वास पूर्णपणे ढळला होता. अशा वेळेला समोर आलेले भारतीय शिष्ट मंडळ हे अतिशय दिल्गीरीपुर्वक वागत होते आणि ते आमच्यावर खूप गोष्टी लादू शकत होते पण त्यांनी नाही लादल्या. आम्ही युद्ध हरलो पण वाटाघाटी जिंकलो.”
विजय वाया घालवू नये नाहीतर पुढे जाऊन सर्वनाश हा लिहिलेला आहे हा एकच बोध जरी मराठे आणि पानिपत या विषयातून घेतला तरी पुष्कळ आहे .



------------ श्री. अजित पिंपळखरे.


No comments:

Post a Comment